रावेरगुन्हे

सावद्यात भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू, पाच जण जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । सावदा शहरातील सोनाली कोल्ड्रिंक्सजवळ भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. एका भरधाव कार चालकाने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर त्याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकाच कुटुंबातील पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात एका ५३ वर्षीय व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आत्माराम बाबुराव ढिवरे असं मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव (ता. रावेर) येथील रहिवासी असलेला कार चालक सरफराज समशेर तडवी हा त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-२० कार (क्रमांक- MH 01 AR 2706) घेऊन वाघोदा बु. कडून सावद्याकडे अतिशय भरधाव वेगाने येत होता. सावदा-वाघोदा मार्गावर आल्यानंतर या कारने सुरुवातीला समोरून येणाऱ्या एका विनानंबर स्प्लेंडर प्लस दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून चिनावल येथील रहिवासी असलेले शेख जकरीया शेख जहीर, शेख रिजवान, शेख रियाज आणि मुदस्सर शेख जमीर हे चौघेजण प्रवास करत होते.

दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोरगाव बु. येथील ढिवरे कुटुंबाच्या अंगावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत आत्माराम ढिवरे यांचा जागीच करुण मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी मंदाबाई ढिवरे, मुलगा मनोहर ढिवरे आणि दुचाकीवरील तीन प्रवासी असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले आणि वाहने बाजूला करून वाहतूक कोंडी फोडली. या प्रकरणी मृत आत्माराम ढिवरे यांचा मुलगा मनोहर आत्माराम ढिवरे (वय २५) याने दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक सरफराज समशेर तडवी याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button