रावेरमध्ये भरधाव कारचा थरार; दोघांना चोप, कारचालकासह दोघे पोलिसांच्या ताब्यात

जुलै 10, 2026 10:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर शहरात भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाने दोन नागरिकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी कारमधील दोन संशयितांना पकडून बेदम चोप दिला आणि त्यांना रावेर पोलिसांच्या स्वाधीन केले.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१९ ईए-२८०३ क्रमांकाची कार पालकडून रमजीपूर आणि रसलपूरमार्गे रावेर शहरात दाखल झाली. पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने कारच्या नंबर प्लेटवरील ‘१९’ मधील ‘९’ आणि शेवटच्या ‘३’ या अंकावर काळी चिकटपट्टी लावून क्रमांक लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

भरधाव कारने नागझिरी चौक, स्वामी विवेकानंद चौक, पाराचा गणपती मंदिर, रथघर चौक, महात्मा गांधी चौक ते आठवडे बाजार परिसरापर्यंत बेदरकार वेगाने धाव घेतली. यावेळी अनेक पादचारी आणि वाहनधारक थोडक्यात बचावले. या प्रकारामुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, कारचा पाठलाग सुरू असतानाच चालकाचा अंदाज चुकल्याने वाहन पाताळगंगा नाल्यातील चिखलात अडकले. याचा फायदा घेत संतप्त नागरिकांनी कारला वेढा घालत दोघा संशयितांना बाहेर ओढले आणि त्यांना चोप दिला. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. चिखलात अडकलेली कार ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढून रावेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास रावेर पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now