शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ घातक तणनाशकावर अखेर बंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जुलै 14, 2026 6:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२६ । शेतकऱ्यांकडून तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ‘पॅराक्वाट’ (Paraquat) हे तणनाशक आता देशभरात बंद करण्यात आले आहे. मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केंद्र सरकारने या तणनाशकाच्या आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापरावर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

ban Paraquat herbicide

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशक कायदा, १९६८ मधील तरतुदींनुसार ही अधिसूचना जारी केली आहे. पॅराक्वाट हे अत्यंत विषारी रसायन असल्याचे विविध संशोधनांमधून समोर आले असून, त्याच्या संपर्कामुळे अनेकांना विषबाधा झाल्याच्या तसेच मृत्यू झाल्याच्या घटनाही देशभरात नोंदवल्या गेल्या आहेत.

पॅराक्वाटचा वापर विशेषतः भात, गहू आणि इतर पिकांतील तण नियंत्रणासाठी केला जात होता. मात्र, आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञ, विषशास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांनी यावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे, पॅराक्वाटचा शोध लागलेल्या देशासह जगातील ७० हून अधिक देशांमध्ये या तणनाशकावर यापूर्वीच बंदी लागू करण्यात आली होती. मात्र, भारतात त्याचा वापर अद्याप सुरू होता. आता केंद्राच्या निर्णयानंतर देशभरातून हे तणनाशक टप्प्याटप्प्याने बाजारातून हटवले जाणार आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तण नियंत्रणासाठी कमी विषारी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा लागणार आहे. कृषी विभागाकडूनही पर्यायी तणनाशके आणि एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now