⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगावकरांचे फुटके नशीब : मनपात सत्ताधारी विरोधात प्रशासन, अशी आहेत नाराजीची कारणे..

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । जळगाव शहर मनपा प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांचे पटले असे गेल्या दहा-पंधरा वर्षात तरी पाहायला मिळाले नाही. दोघांचा ताळमेळ बसत नसल्यानेच जळगाव शहराचा विकास रखडत आहे त्यातच दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जळगावकरांच्या जबाबदारीचे ओझे येऊन पडले आहे. जळगाव शहरच्या विद्यमान आयुक्त विद्या गायकवाड आणि सत्ताधारी शिवसेनेत सध्या शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. एकीकडे आयुक्त प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई करताना दिसून येत असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. एकंदरीत काय तर आयुक्तांचा मनमौजी कारभार सुरु आहे. जळगावकरांच्या नशिबी आलेले भोग कधी कमी होणार हे माहिती नसले तरी या शीतयुद्धाचा काय परिणाम होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संपूर्ण महाष्ट्राने नुकतेच शिवसेनेतील नाराजी नाट्य पाहिलं. असंच काही नाराजी नाट्य आता मनपामध्ये सुरू झाल आहे. जळगाव शहर मनपाच्या नवनियुक्त आयुक्त वर्षा गायकवाड यांच्या धोरणामुळे मनपातील लोकप्रतिनिधी त्यांच्यावर नाराज आहेत. विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधींमध्ये महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व इतर जेष्ठ लोकप्रतिनिधींचा देखील समावेश आहे.

वर्षभरावर जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक आली आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींना आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवायच्या आहेत. नागरिक आपली समस्या घेऊन एकतर महापौरांकडे किंवा उपमहापौरांकडे जातात. आयुक्तांनी घेतलेल्या धोरणांमुळे लोकप्रतिनिधींचे आणि आयुक्तांचे संभाषण होत नसून समन्वयात अभाव दिसून येत आहे. आयुक्त विद्या गायकवाड कित्येक निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेत असतात. यामुळे त्यांच्यामध्ये आणि लोकप्रतिनिधिंमध्ये समन्वयाची दरी पाहायला मिळते.

नवीन नियुक्त आयुक्त गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र रजेवर जाण्यासाठी त्यांनी ही माहिती महापौरांना किंवा इतर लोकप्रतिनिधींना देणे आवश्यक होते. मात्र माहिती न देता थेट रजेवर निघून गेल्या. यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधी नाराज आहेत.

याचबरोबर लोकप्रतिनिधींनी आजवर आपापल्या समस्या आयुक्तांपुढे मांडायचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त नागरिक समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही लोकप्रतिनचे म्हणणे असून यामुळे लोकप्रतिनिधी आयुक्तांवर नाराज आहेत.

अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी लोकप्रतिनिधींची इच्छा असूनही त्यावर अजून आयुक्त काही निर्णय घेत नाहीयेत. इथे शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र आयुक्त याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्यामुळे लोकप्रतिनिधी आयुक्तांवर नाराज आहेत.

घनकचरा प्रकल्पाबाबतची बैठक गेल्या दोन महिन्यापूर्वी घेण्यात आली. त्यानंतर कित्येकदा लोकप्रतिनिधी याबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा केला. मात्र आयुक्तांनी याबाबत काहीही निर्णय घेतला नाही. यावरूनही लोकप्रतिनिधी त्यांच्यावर नाराज आहेत.

आयुक्त विद्या गायकवाड यांनी नुकताच बालगंधर्व येथे असलेले भंगार विकून त्यातून मनपासाठी निधी उपलब्ध करून दिला. हा निर्णय योग्यच होता, मात्र हा निर्णय घेत असतांना त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना कोणत्याही लोकप्रतिनिधीला दिली नाही. यावरूनही लोकप्रतिनिधी आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर नाराज आहेत.