जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली १० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाची विशेष टीम तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते ३.०५ वाजेच्या सुमारास प्रकाश मेडिकल चौक ते महात्मा फुले मार्केटदरम्यान टीप-टॉप वेअर दुकानासमोर फिर्यादी जावेद खान रसूल खान (वय ४०, रा. मासूमवाडी, जळगाव) यांच्या पँटच्या खिशातून १० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत अरशद शेख रज्जाक उर्फ चिकू शाहरुख (वय ३२), फारुख शेख हनीफ (वय २८) आणि शाकीर शेख शकील उर्फ घाऱ्या राजू (वय ३०, सर्व रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) यांना ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या उपस्थितीत चौकशी केली असता तिघांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली १० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.










