जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावरील आसोदा रेल्वे उड्डाणपूलाचा भराव भराव खचल्याने आणि रस्त्याला तडे गेल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली आहे. घटनेनंतर आज सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कंत्राटदारवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली.

पाहणीदरम्यान मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. रस्त्याचा भराव नेमका कशामुळे खचला, पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला होता का, तसेच बांधकामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे का, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती मागविली. तसेच भराव खचण्यामागील कारणांचा सखोल तपास करून दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

विशेष म्हणजे, अवघ्या वर्षभरापूर्वीच हा बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच मोठ्या पावसात उड्डाणपुलाखालील भराव खचल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारामुळे संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे वाहतूक अद्याप बंद असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
या पाहणीवेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तांत्रिक माहिती सादर करत दुरुस्तीच्या प्रस्तावित उपाययोजनांची माहिती मंत्र्यांना दिली.







