जळगाव लाईव्ह न्यूज । जुलै महिनाभर जळगावसह राज्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ऑगस्टच्या सुरुवातीलाच विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असणार याबाबतचा अंदाज समोर आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहणार असून, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उकाड्यात वाढ होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान अभ्यासकच्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात 15 ऑगस्टपर्यंत केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. या कालावधीत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता कमी असून, त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांचा अंदाज व्यक्त करताना सांगितले की, नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने उकाडा वाढू शकतो.
सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात मध्यम तीव्रतेची ‘एल निनो’ परिस्थिती कायम असून, मान्सूनच्या उर्वरित काळात ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज
2 ऑगस्ट : रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
3 ऑगस्ट : रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट.
4 ऑगस्ट : बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज.
5 ऑगस्ट : बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी असली तरी, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी काही भागांत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 15 ऑगस्टनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












