⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

मोठी बातमी : मविप्रचा ताबा नरेंद्र अण्णा गटाकडेच, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या ताब्यावरून मागील काही काळापासून वाद सुरु आहे. अशातच मविप्र वर दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या गटाचाच ताबा राहणार असल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सोबतच भोईटे गटाला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती विजय भास्कर पाटील यांनी दिली आहे.

नेमका काय आहे प्रकरण?

२०१५ साली झालेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या निवडणूकीत नरेंद्र पाटील यांच्या गटाने विजय मिळविला. निवडून आल्यावर त्यानी २०१७-१८ पर्यंत कामकाज पाहिले. फेब्रुवारी २०१८ मध्ये शिक्षण अधिकारी जळगाव यांच्या नावे ‘शेड्युल एक कार्यकारणी अवैध असून त्या संदर्भात खुलासा करण्याचे मंत्रालयातून पत्र आले. दरम्यान पोलिसांकडे भोईटे गटाने संस्थेच्या नोंद असताना कार्यालयाचा ताबा मिळावा यासाठी पोलीस अधिक्षक आणि जिल्हा पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.

पहिला निर्णय मान्य

दरम्यान, या प्रकरणी झालेल्या सुनावणीत तत्कालिन तहसीलदार अमोल निकम यांनी पहिला निकाल हा नरेंद्र पाटील गटाच्या बाजुने दिला मात्र नंतर त्यांनी तो निकाल बदलत दुसर्‍या आदेशात भोईटे गटाची सत्ता असल्याचे म्हटले होते. या आदेशाला नरेंद्र पाटील गटाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबत न्यायाधिशांनी २३ पानांचा विस्तृत निकाल दिला आहे. त्यामुळे तत्कालीन तहसिलदारांनी ही संस्था नरेंद्र पाटील गटाच्या ताब्यात देण्याचा पहिला निर्णय मान्य झाला आहे. त्यामुळे आता संस्थेवर पाटील गटाचाच ताबा असल्याचा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला होता.

यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. येथे यावर सुनावणी झाली. यात जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळावर स्व. नरेंद्र भास्कर पाटील गटाचाच ताबा राहणार असून विजय भास्कर पाटील हे अध्यक्ष असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या संदर्भात विजय भास्कर पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या खटल्यात भोईटे गटाला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.