Suicide : चोपडा सूतगिरणी संचालकाने विषारी औषध प्राशन करून संपविले जीवन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द येथील रहिवासी व चोपडा तालुका तापी सहकारी सूतगिरणीचे संचालक राहुल मच्छिंद्र बाविस्कर (वय ४१), यांनी २८ रोजी पहाटे पाच वाजता विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली.

बाविस्कर यांनी २८ रोजी पहाटे आपल्या राहत्या घरी अगोदर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्यांनी फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. त्यांच्यावर चोपडा येथील खासगी रुग्णालयात शनिवारपासून उपचार सुरू होते. मात्र रविवारी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शेतीवर असलेले कर्ज आणि एका राष्ट्रीयकृत बँकेचे त्यांच्यावर कर्ज होते. यामुळे बाविस्कर यांनी आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात सांगितले. घटनेचे वृत्त कळताच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त करत, चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तसेच मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, चोसाकाचे माजी चेअरमन ऍड. घनश्याम पाटील यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते. दुपारी दोन वाजता हातेड खुर्द गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. बाविस्कर यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, बाविस्कर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.