जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । सुरेश ज्ञानविहार विद्यापीठ जयपूर (राजस्थान) येथे दि १६ ते २० एप्रिलदरम्यान घेण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पुरुष व महिला खेळाडू संघ सहभागी झाला होता. यात मू. जे. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारांत उत्तम कामगिरी दाखवीत १ सुवर्ण व ४ कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाचे खेळाडू अनिकेत देवले, यश पाटील, शेखर ताडे व जितेंद्र उदेसिंग राठोड यांचा पुरुष संघात तर वैष्णवी देशमुख, पौर्णिमा चव्हाण, कोमल गायकवाड, योगिता पाटील या विद्यार्थिनींची महिला संघात निवड झाली होती. स्पर्धेत या खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारांत उत्तम कामगिरी करत १ सुवर्ण व ४ कांस्य पदक प्राप्त केले. यात शेखर ताडे याने सुवर्ण पदक तर यश पाटील, जितेंद्र राठोड वैष्णवी देशमुख व कोमल गायकवाड यांनी कांस्यपदक प्राप्त केले. या खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचा अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, डॉ. सी. पी. लभाणे यांनी गौरव केला.