जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर

ऑगस्ट 8, 2026 1:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रत्येकाला योग्य कायदेशीर मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे ९ ऑगस्ट रोजी मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम संचालित या फाउंडेशनचे हे दुसरे शिबिर असून, ते सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ठाकूर समाज मंगल कार्यालय, पिंप्राळा (जळगाव) येथील सभागृहात पार पडणार आहे.

aniket nikam

‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी पहिले मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिर गेल्या महिन्यात यशस्वीरीत्या पार पडले होते. त्या शिबिरात २५० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध शंकांचे निरसन करून घेतले होते. पहिल्या शिबिराला जळगावकरांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहूनच या दुसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांना जमिनीचे वाद, ७/१२ उताऱ्याशी संबंधित प्रश्न, मालमत्तेचे हक्क, पती-पत्नीमधील वाद, कौटुंबिक प्रकरणे, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रकरणे, सायबर गुन्हे व ऑनलाईन आर्थिक फसवणूक, तसेच महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क यांसह विविध विषयांवर मोफत सल्ला दिला जाणार आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सरकारी मोफत कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याविषयीही तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शिबिरास उपस्थित राहताना नागरिकांनी शासकीय ओळखपत्र जसे की, आधार कार्ड किंवा अन्य वैध ओळखपत्र, संबंधित जमिनीची व मालमत्तेची कागदपत्रे, तसेच पोलीस अथवा न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनंदिन जीवनात कोर्ट-कचेरी, जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, पोलीस तक्रारी, कौटुंबिक वाद किंवा विविध कायदेशीर कागदपत्रांबाबत अनेक नागरिक संभ्रमात असतात. योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकदा अनावश्यक मानसिक, आर्थिक व कायदेशीर त्रास सहन करावा लागतो. हीच अडचण दूर करण्यासाठी न्याय विश्वास फाउंडेशन जळगाव अनुभवी वकिलांच्या सहभागातून हे मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करत आहे.

  • ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम, अध्यक्ष, न्याय विश्वास फाउंडेशन

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now