जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑगस्ट २०२६ । किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात घडली. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आज शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास विद्यार्थी क्लासवरून शाळेत जात असताना अयोध्या नगर परिसराती आरोपी विद्यार्थ्याने मागून येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्याच्या बरगडीजवळ गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी विद्यार्थ्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर घटनास्थळ येथील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तपासणीचे काम सुरु केले आहे.











