जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जामनेर येथील तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणाची माहिती दिली होती. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट सही वापरून तब्बल ५९१ कोटी रुपयांचे बनावट टेंडर काढण्यात आले होते. या बनावट टेंडरच्या माध्यमातून तीन कंत्राटदारांना कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यांच्याकडून ३ कोटी ५ लाख रुपये उकळण्यात आले.

कंत्राटदारांनी दिलेली ही संपूर्ण रक्कम संशयित आरोपींच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत जळगावमधून दोन्ही मुख्य संशयितांना गजाआड केले.
या फसवणूक प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.












