जळगाव लाईव्ह न्यूज । तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून यामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरणाचे काही दरवाजे एक मीटरने उघडले असून, त्यातून तापी नदीच्या पात्रात १७,२३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाची स्थिती आणि धरणातील आवक लक्षात घेऊन विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

यापूर्वी ३१ जुलै रोजी तापीवरील हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते. त्यावेळी धरणातून तब्बल ३,१५,२२२ क्यूसेक म्हणजेच ८,९२६ क्यूमेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू होता. मात्र मागच्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात पाण्याची अवाक कमी झाली होती. परिणामी अनेक दरवाजे बंद करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा तापी नदीपात्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या आवकेच्या पार्श्वभूमीवर धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीच्या पात्रात १७,२३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास हतनूर धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. आवक वाढल्यास धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आणखी दरवाजे उघडण्यात येऊ शकतात, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे धरणातील आवक, पाण्याची पातळी आणि नदीपात्रातील विसर्ग यावर विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








