जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२५ । खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभाग नोंदवून प्रशासनाचा निषेध केला.

काय आहे नेमकं प्रकरण?
इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणावरून खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांचे गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, शासन कवडीमोल भावाने शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करून केंद्र सरकार सुलतानी पद्धतीने कारभार करत आहे. काही दिवसांपूर्वी तर, संबंधित कामाच्या ठेकेदाराने दादागिरी करत शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या केळीच्या पिकांमध्ये जेसीबी घालून ते जमीनदोस्त केले होते. या अमानुष कृत्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते, त्यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी झटापटही झाली होती. यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते.

आज पुन्हा पोलीस बळाचा वापर करून बंद असलेले रस्त्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून दिसताच, शेतकऱ्यांनी पुन्हा फाटा (तालुका मुक्ताईनगर) येथे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सहभाग नोंदवला. हे आंदोलन चिघळत असल्याचं पाहताच पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली. त्यांना पुढील कारवाईसाठी भुसावळ येथील बाजार पोलीस स्थानकात हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान आमदारांना अटक कझाल्याची बातमी मुक्ताईनगरात पसरताच, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि कडकडीत बंदची हाक देण्यात आली. व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभाग नोंदवून प्रशासनाचा निषेध केला. मुक्ताईनगरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.











