जळगाव लाईव्ह न्यूज । कडधान्य आत्मनिर्भरता अभियान रब्बी हंगाम सन २०२६-२७ अंतर्गत हरभरा व मसूर पिकाचे अनुदानावर पीक प्रात्यक्षिक बाबी राबविण्यात येत आहेत. हरभरा पिकासाठी पीक प्रात्यक्षिक अनुदान १० हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण भौतिक लक्षांक १८० हेक्टर तसेच मसूर पिकासाठी पीक प्रात्यक्षिक अनुदान १० हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण भौतिक लक्षांक ७० हेक्टर असा जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक व आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे.

या बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर ‘बियाणे’ या टाइलअंतर्गत ‘बियाणे’ घटकामध्ये हरभरा व मसूर पिकासाठी पीक प्रात्यक्षिक बाबीसाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी अर्ज करावा.

शेतकरी गट ३१ मार्च २०२६ पूर्वी नोंदणी केलेला असावा. गटाची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर केली जाईल. प्रति गट कमाल २५ शेतकरी व प्रति गाव, प्रति पिक जास्तीत जास्त २ गट निवडले जातील. लाभ द्यावयाच्या शेतकरी सभासदाचा अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी हमीपत्र देणे बंधनकारक राहील.
तरी जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.







