जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केली जात असून या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभावी, यासाठी जळगावच्या राजकीय व सहकार वर्तुळातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांनी मुंबईत जाऊन ‘सिल्वर ओक’ येथे शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांच्या वेळापत्रकानुसार आणि सोयीच्या वेळेनुसार या कार्यक्रमाची तारीख व वेळ निश्चित करून देण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे. भेटीत सकारात्मक चर्चा झाली असली, तरी अद्याप अनावरण सोहळ्याची अंतिम तारीख ठरलेली नाही. मात्र, या दिमाखदार सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार का, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान केवळ पुतळ्याच्या अनावरणावरच नव्हे, तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावरही सविस्तर चर्चा झाली. बँकेमार्फत राबवले जाणारे उपक्रम, शेतकरी व ग्रामीण भागाशी असणारे आर्थिक संबंध आणि सहकार क्षेत्रातील वाटचालीचा शरद पवार यांनी आढावा घेतला. ग्रामीण अर्थव्यवस्थेत जिल्हा बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तसेच, आमदार अमोल पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली. याशिवाय, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत शरद पवार यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. आगामी काळात ठरणाऱ्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या तारखेविषयी आता उत्सुकता वाढली आहे.









