पोलीस दलाच्या दिमतीला १२ नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण

सप्टेंबर 21, 2026 8:31 PM

गेल्या चार-पाच वर्षांत ३०१ वाहनांसाठी ११.५२ कोटींचा निधी

harbhara masur 1

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या १२ नवीन महिंद्रा बोलेरो निओ श्रेणीतील चारचाकी वाहनांचे लोकार्पण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज येथील पोलिस आयुक्तालयातील आवारात करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, रेल्वे पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राहुल गायकवाड, मोटार परिवहन विभाग अधिकारी प्रवीण तायडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नव्या वाहनांमुळे पोलीस ठाण्यांची नियमित गस्त, बंदोबस्त तसेच आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी तातडीने पोहोचण्यास मदत होणार आहे. सन २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागासाठी एकूण १४ नवीन चारचाकी वाहनांना १ कोटी ४४ लाख २९ हजार २७८ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव पोलीस विभागासाठी १० तसेच चाळीसगाव व भुसावळ लोहमार्ग पोलिसांसाठी प्रत्येकी एक अशा १२ वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. या १२ वाहनांची प्रत्यक्ष खरेदी किंमत १ कोटी १६ लाख १६ हजार रुपये आहे. उर्वरित दोन वाहने बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकासाठी आहेत.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाकडे सक्षम मनुष्यबळाबरोबरच पुरेशी वाहने आणि आधुनिक साधनसामग्री असणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या गरजांना सातत्याने प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला आहे. नव्या वाहनांमुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होऊन नागरिकांच्या मदतीच्या हाकेला अधिक जलद प्रतिसाद देता येणार आहे.”

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असल्याचे नमूद करताना पाटील म्हणाले की, “सण-उत्सव शांततेत आणि आनंदात पार पडावेत यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून, पोलीस दलाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.”

मागील चार-पाच वर्षांत ३०१ वाहनांसाठी ११.५२ कोटी

जिल्हा वार्षिक योजनेतून गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत पोलीस विभागाच्या वाहन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. या कालावधीत ११३ चारचाकी आणि १८८ दुचाकी अशी एकूण ३०१ वाहने पोलीस विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी ११ कोटी ५२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस ठाणे व विविध शाखांच्या क्षेत्रीय कामकाजासाठी वाहनांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की, “जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र लक्षात घेता वाहनांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. नव्या वाहनांमुळे पेट्रोलिंग, बंदोबस्त तसेच तातडीच्या घटनांना प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार आहे. विशेषतः सण-उत्सवाच्या काळात ही वाहने पोलीस यंत्रणेसाठी उपयुक्त ठरतील.” पोलीस दलाच्या गरजांना सातत्याने प्रतिसाद देत वाहनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now