जळगाव लाईव्ह न्यूज | ९ सप्टेंबर २०२३ | जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पुढाकारातून मनपातर्फे पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, तर महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण १० सप्टेंबरला माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र त्यास आता राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन आहेत, तर उपमहापौर कुलभूषण पाटील हे ठाकरे गटाचेच आहेत. पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी पुतळ्याच्या अनावरणास आपण येऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार १० तारखेला पुतळ्याचे अनावरण करण्याचा ठरविण्यात आले. तर दुसरीकडे महापालिकेच्या इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही महापालिकेतर्फे उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्या पुतळ्याचे अनावरणही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १० सप्टेंबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ १७ सप्टेंबरला संपणार आहे. यामुळे त्यांना त्यांच्या कार्यकाळातच पुतळा अनावरण करायचे आहे. पुतळा अनावरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौराही प्राप्त झाला आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी ७ सप्टेंबरला महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन दोन्ही पुतळ्याचे अनावरण शासकीय प्रोटोकॉलनुसार व्हावे, अशी मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच जिल्ह्यातील तिन्ही मंत्री यांची तारीख व वेळ घ्यावी, त्या तारखेलाच लोकार्पण, उद्घाटन सोहळा शासकीय प्रोटॉकॉलनुसार करावे, अशी मागणी केली.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल पुतळा अनावरणास शासनाने स्थगिती दिली असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तारीख व वेळ मागण्यात आली आहे. त्यादरम्यान कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे पत्र शासनाच्या उपसचिवांनी महापालिकेस पाठविल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. पुतळा अनावरण कार्यक्रमाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याबाबत आता सत्ताधारी व विरोधी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शनिवारी (ता. ९) सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे. यात शिवसेना ठाकरे गट, भाजप, शिवसेना शिंदे गटाचे नेते बसून भूमिका ठरविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.