जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । महाराष्ट्रात दणक्यात एन्ट्री केलेल्या मान्सून पाऊस खोळंबला असून पावसाने ब्रेक घेतल्याने उकाडा मात्र वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले. यातच मागच्या दोन दिवसापासून जळगावसह राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान आज राज्यातील २३ जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४० ते ५० किमी/तास वेगाने सोसाट्याचे वारे, विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरीसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

महाराष्ट्रात येत्या २४ तासांत काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.कोकणातील किनारपट्टी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे, तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. मागच्या दोन दिवसापासून सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला. दरम्यान हवामान खात्यानं आज जळगाव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
दरम्यान , यंदा वेळेआधी म्हणजेच १२ ते १४ दिवस पूर्वीच मान्सून राज्यात दाखल झाला. यानंतर तीन चार दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. मात्र यानंतर काही दिवसापासून पावसाने ब्रेक घेतला आहे. तर दुसरीकडे तापमानात काहीशी वाढ झाल्याने उकाडा वाढला. मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू शेतकरी वर्गाचे जोरदार पावसाकडे लक्ष लागले आहे. अशातच राज्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात १२ ते १३ जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.यावर्षी सरासरी १०६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.