जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यापासून अनेक निर्णय घेतले. आता यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता १२ देशांच्या नागरिकांचा अमेरिकेत प्रवेशावर पूर्ण बंदी आणली आहे. या नवीन निर्णयावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील वृत्त सीबीएस न्यूजने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

कोणत्या देशांवर बंदी
अमेरिकेत आता अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यासह १२ देशांच्या नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या देशांचे नागरिक आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाहीत. तसेच ७ देशांमधून येणाऱ्या लोकांवरही बंदी घातली आहे. यामध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. या देशांमधून येणाऱ्या लोकांवर काही अटी आणि कडक तपासणीनंतर अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे.
ट्रम्प यांनी काय म्हटले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. अमेरिकन नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले आहे. आम्ही पुन्हा प्रवास बंदी लागू करू, त्याला काही लोक ‘ट्रम्प ट्रॅव्हल बॅन’ म्हणतात. यामुळे कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना देशात प्रवेश करण्यापासून रोखता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा हा निर्णय योग्य ठरवला होता.