जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२५ । जळगाव शहरात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून यातच शहराजवळील निमखेडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी मयत बांधवांची नावे आहेत.

निमखेडी येथील कांताई नेत्रालयाजवळ ही घटना घडली. मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. त्यांच्या कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आणि माल घेण्यासाठी हे दोन्ही भाऊ पहाटे चार वाजता रिक्षाने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. एकाच अपघातात दोघं सख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.