⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

मेहुण्याला मारहाण करून विहिरीत फेकले, शालकाला ७ वर्ष कारावासाची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । जामनेर तालुक्यात डिसेंबर २०१९ मध्ये रात्रीच्या सुमारास शालक आणि मेहुण्याचा वाद सुरू होता. मेहुण्याच्या डोक्यात विटाने मारहाण करीत शालकाने त्यास विहिरीत फेकून दिले होते. पहुर पोलिसात दाखल या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.एस. जी.ठुबे यांनी निकाल दिला आहे. आरोपी शालक दिवाकर प्रभाकर जटाळे (वय – ४०) यास न्यायालयाने सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याने सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

दिनांक २८ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी स्वाती संजय पाटील यांचा भाऊ आरोपी दिवाकर प्रभाकर जटाळे, वय – ४० वर्षे, रा.देउळगांव गुजरी, ता. जामनेर हा फिर्यादीचा पती संजय लक्ष्मण पाटील असे घरी आले व दरवाजासमोर एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण करायला लागले. त्यावेळी आरोपी याने संजय लक्ष्मण पाटील यास मारहाण करुन जमिनीवर पाडून छातीवर बसून त्याचे हातातील विटाने तोंडावर मारण्यास सुरुवात केली. त्यांचे नेहमीचे भांडण असल्याने फिर्यादी व तिची मुलगी विद्या असे घाबरून घरात जावून आतून दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी आरोपीने मयतास विटाने तोंडावर मारहाण करून जवळ असलेल्या विहीरीत फेकले व त्यावेळेस विहीरीत काहीतरी पडल्याचा आवाज फिर्यादी व तिच्या मुलीस आला. त्यांनी दरवाजा उघडला असता आरोपी दरवाजाजवळ येवून फिर्यादीस म्हणाला की, “मी तुझे नव-याला मारुन विहीरीत फेकून दिलेले आहे. फिर्यादी व तिची मुलगी घाबरुन झोपून राहिल्या व सकाळी उठल्यावर पुन्हा आरोपाने सांगितले की, “तु कोणाला सांगू नको, जे काही सांगायचे ते मी सर्वांना सांगेल”.

दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोक जमले त्यावेळेस आरोपीने पुन्हा सर्वांसमक्ष “मयत संजय याला रात्री मारुन विहीरीत फेकल्याची कबुली दिली” वरील घटनेवरून पहुर पोलीस स्टेशन, जामनेर येथे आरोपीविरुध्द भा.द.वि. कलम ३०२ व ५१० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचे तपास अधिकारी ए.पी.आय. राकेशसिंग परदेशी यांनी सर्वांकुश तपासकाम करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात झाले. खटल्याच्या कामी सरकारपक्षातर्फे एकुण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात फिर्यादी व तिची मुलगी स्वाती यांची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून व इतर गावातील गृहस्थांसमोर घटनेची कबुली आरोपीने दिलेली असल्याने त्यांची साक्ष ज्यादा न्यायिक कबुली जबाब म्हणून महत्वपूर्ण ठरल्या. तसेच जरी आरोपीने मयताचा खून केल्याचे मान्य केले असले तरी, मारण्याचा हेतू व उद्देश निष्पन्न न झाल्यामुळे भा.दं.वि. चे कलम ३०२ ची शिक्षा न देता भा.दं.वि. चे कलम ३०४ पार्ट २ खाली सदोष मनुष्यवध यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील पंढरीनाथ बी. चौधरी यांनी कामकाज पाहीले. तसेच आरोपीतर्फे ऍड.केतन सोनार यांनी कामकाज पाहिले व पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी तसेच केस वॉच श्री.मारवडकर यांनी सरकारपक्षाला सहकार्य केले. न्यायालयाने सरकारपक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांचा प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपीस भा.दं.वि. चे कलम ३०४ पार्ट २ खाली दोषी धरून सात वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंड, फिर्यादी हीस २५ हजार रुपये उदरनिर्वाहासाठी नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश केलेले आहे. तसेच दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आरोपी हा घटनेपासून कारागृहातच आहे.