जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील सावखेडा बुद्रूक परिसरात गोठ्यातून चोरीला गेलेल्या तीन बैलजोड्यांचा सावदा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. चोरांकडून सहा बैलांसह बोलेरो पिकअप व दुचाकी असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काय आहे घटना?
७ ऑगस्टला रात्री १२.३० ते पहाटे ५ वाजेदरम्यान अलाउद्दीन नबाब तडवी, गुलशेर बशीर तडवी आणि संजू नबाब तडवी यांच्या मालकीच्या गोठ्यातून सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या तीन बैलजोड्या चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आवेश खान एजाज खान (२०), शेख हयात शेख मासूम (२५) आणि शेख नासीर शेख चाँद कुरेशी (४२) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींकडून बैलजोड्या चोरी केल्याची माहिती मिळाली. नंतर पोलिसांनी चोरीला गेलेले सहा बैल जप्त करून संबंधित मालकांच्या स्वाधीन केले. गुन्ह्यात वापरलेली सुमारे ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप आणि २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी जप्त केली.

या प्रकरणातील शेख राजीक (रा. रसलपूर) हा पसार आहे. अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली. सावद्याचे एपीआय गणेश फड, उपनिरीक्षक राहुल सानप, जयराम खोडपे, नीलेश बाविस्कर, मेहरबान तडवी व संजीव चौधरी यांच्या पथकाने तपास केला. दरम्यान या संशयितांनी अजून इतरही काही चोऱ्या केल्याचा संशय आहे. त्या पद्धतीने पोलिस यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. लवकरच सत्यता समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.










