‘गोवंशाची कत्तल केली’ म्हणत ५ लाखांची मागणी; चोपड्याच्या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा

ऑगस्ट 8, 2026 9:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । म्हशीच्या रेडकूची कत्तल करून त्याची विक्री करण्यासाठी नेल्याच्या प्रकरणात ‘गोवंशाची कत्तल केली’ अशी धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार जळगावात समोर आला आहे. याप्रकरणी दोन कथित माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.

crime 2 jpg webp

काय आहे घटना?

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवाशी रफिक फकीर मोहम्मद कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी त्यांनी म्हशीच्या रेडकूची कत्तल केली होती. त्यानंतर कोमल बापुराव पाटील व जितेंद्र रुपसिंग चौधरी (दोघे रा. चोपडा) हे त्यांच्या घरात आले. त्यांनी घरातील प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यावेळी ‘गोवंशाची कत्तल केली आहे, कारवाई टाळायची असेल तर पाच लाख रुपये द्या’, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. कुरेशी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधितांनी पोलिसांना फोन केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता संबंधित मांस हे गोमांस नसल्याचे स्पष्ट झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर कुरेशी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी कोमल पाटील आणि जितेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

संघटनेचे ओळखपत्र जप्त

पोलिसांनी आरोपींकडून ‘शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटने’चे ओळखपत्र जप्त केले आहे. या ओळखपत्रावर कोमल पाटील या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष, तर जितेंद्र चौधरी हे जिल्हाध्यक्ष असल्याचे नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर बाबींचाही तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now