जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलीय. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील तब्बल १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे मुकुट आणि छत्र्या लंपास केल्या आहेत. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनेल गेटचे तसेच गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंडे तोडून मंदिरात अनधिकृत प्रवेश केला.

त्यानंतर चोरट्यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरी झालेल्या ऐवजामध्ये मनुदेवी माता मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत ४० हजार ५०० रुपये) आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री (किंमत २७ हजार रुपये) यांचा समावेश आहे. तसेच रेणुका माता मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत ४० हजार ५०० रुपये) आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री (किंमत २७ हजार रुपये) चोरट्यांनी लंपास केली. अशाप्रकारे एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आडगाव येथील रहिवासी आणि शेतकरी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी मंदिरात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.











