जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२६ । जळगाव जिल्ह्यात आज, रविवारी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज रविवारी राज्यातील जळगावसह १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, आज हवामानातील बदलांमुळे अनेक भागांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात ढगांच्या गडगडाटासह अन् विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अचानक येणाऱ्या या वादळी पावसामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट:
हवामान विभागाने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उर्वरित महाराष्ट्र आकाश ढगाळ राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यासाठी यापूर्वी सलग दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या दोन्ही दिवसांत जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसून पावसाने हुलकावणी दिली. आता आज, रविवारी पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







