जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडी मोडली असून अशातच आता वाढत्या महागाईच्या काळात महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आणखी एक झटका बसणार आहे. तो म्हणजे राज्यात गाय आणि म्हशीच्या दूधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहे.

दूध उत्पादक आणि प्रक्रिया करणारे कल्याण संघटनेच्या पुढाकाराने राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी डेअरींच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत वाढत्या उत्पादन आणि प्रक्रिया खर्चाचा विचार करून दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही काळात दूध उत्पादन आणि वितरणाचा खर्च सातत्याने वाढला आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमतीसोबतच दूध पॅकेजिंगचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला असून, पॅकेजिंग खर्चात सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. याशिवाय डेअरींना दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक दर मोजावे लागत आहेत. भविष्यात दूध खरेदी दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
केवळ दूधच नव्हे, तर विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. संघटनेने दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.दूध हा दररोजच्या आहारातील अत्यावश्यक पदार्थ असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या घरगुती बजेटवर होणार आहे. विशेषतः दररोज मोठ्या प्रमाणात दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या खर्चात वाढ होणार आहे.
यापूर्वीही अनेक कंपन्यांनी वाढवले होते दर
यापूर्वी मे महिन्यात अमूल, मदर डेअरी, सुधा आणि जयपूर डेअरी यांसारख्या कंपन्यांनीही दुधाच्या दरात वाढ केली होती. वाढता उत्पादन आणि वाहतूक खर्च हे दरवाढीमागील प्रमुख कारण असल्याचे संबंधित कंपन्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतीतील चढ-उतार, वाहतूक खर्च आणि इतर इनपुट कॉस्ट वाढल्याचा परिणाम दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीवर होत आहे. त्यामुळे आगामी काळातही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.












