⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘त्या’ वक्तव्यावरून जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात शिवसैनिक आक्रमक

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । जळगावमध्ये सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली. या विरोधात जळगावातले ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून मंत्री पाटलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धडक दिली आहेत. यासाठी शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.

सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या. पहिल्या दिवसापासून सुषमा अंधारे विरुद्ध गुलाबराव पाटील असे शाब्दिक युद्ध रंगले आहे. मुक्ताईनगर येथील सभेला परवानगी नाकारल्यानंतर सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती.

सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देताना ना.गुलाबराव पाटील यांनी जहरी टीका केली. ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुषमा अंधारे यांना पाठवले आहे, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले होते. यावेळी शिवसेनेने पिक्चर चालविण्यासाठी सुषमा अंधारे सारखी नटी बाई आणली असा उल्लेख केला होता.

गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाही. आम्हाला कोणतीही बंदी घातली तरी महाप्रबोधन यात्रा सुरूच राहील. या सरकारने माफिया आणि गुंडांना हाताशी धरले आहे, बहुजन असल्याने माझ्यावर कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता.