
जळगाव लाईव्ह न्यूज । सद्यस्थितीत दुष्काळाच्या चिंतेने ग्रासलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांना दिवाळीच्या आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, त्यांच्यावरील मानसिक ताण हलका होऊन त्यांना सहकुटुंब तणावमुक्त वातावरणात सणाचा आनंद लुटता यावा, या सामाजिक भावनेतून राज्याचे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘यंदाची दिवाळी : माणुसकीची दिवाळी – संवेदना दिवाळी !’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिवाळीच्या पूर्वसंध्येला निंभोरा (ता. रावेर ) येथील आठवडे बाजार चौकात आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने अवघ्या गावात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि मनोरंजनाच्या विविध रंगतदार कार्यक्रमांमुळे गावातील महिला भगिनींचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा विभागाच्या जिल्हाध्यक्षा तथा निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांच्या संकल्पनेतून, निंभोरा येथील माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमा पूजनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रावेरचे उपनगराध्यक्ष आसिफ दारा शेख, जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका वैशाली अमित पाटील, सावद्याच्या नगरसेविका रेखा राजेश वानखेडे व सिमरन वानखेडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष कुर्बान शेख, भोरगाव लेवा पंचायतीच्या संचालिका प्रमिला चतुर्भुज खाचणे, रावेर पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती प्रल्हाद बोंडे, विवरा येथील माजी सरपंच तथा भाजपच्या ओबीसी विभागाचे जिल्हा सरचिटणीस वासुदेव नरवाडे, बलवाडीचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र संतोष महाजन, उपसरपंच संजय वाघ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख वाय.डी.पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन सुधीर मोरे,श्री सद्गुरू सीएससी सेंटरचे संचालक ललित जीवन सोनार, भाजपचे शक्तीप्रमुख रवींद्र महाले,सामाजिक कार्यकर्ते युनूसखान अमान खान, युवा व्यापारी नदीम शेख,युवा उद्योजक इमरान पटेल आणि शकील खाटीक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
शुभम म्हस्के यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत :
पुणे येथील सुप्रसिद्ध टीव्ही अँकर तथा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे संयोजक शुभम म्हस्के यांनी आपल्या खास शैलीत आणि कौशल्यपूर्ण सूत्रसंचालनातून कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली,त्यांनी निंभोरा गावातील महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील उत्साहाला मुक्त वाट करून दिली. विशेष म्हणजे, वयाची नव्वदी पार केलेल्या श्रीमती कमलबाई शिवाजीराव पवार,पंच्याहत्तर वर्षाच्या श्रीमती गुंफाबाई राजाराम बोंडे तसेच अवघ्या दीड महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन सौ.धनश्री युगल राणे यांच्यासह विविध वयोगटांतील महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विविध रंजक खेळ, धमाल विनोद, उखाणे, नृत्य आणि गप्पागोष्टी अशा मनोरंजनात्मक उपक्रमांतून महिलांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. वयाचे बंधन बाजूला सारत महिलांनी घेतलेला सहभाग आणि त्यांचा उत्साह उपस्थितांची मने जिंकणारा ठरला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुमारे ६४ महिलांना निंभोरा गाव सेवा समितीच्या वतीने सेमी पैठणी साडी भेट देण्यात आली.
६४ पैकी तिघं ठरल्या होम मिनिस्टर :
अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत विविध फेऱ्यांमधून यशस्वी होत प्रथम क्रमांकाचे एलईडी टीव्ही हे पारितोषिक सौ.सोनाली नितीन कोळंबे यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे मिक्सर ग्राइंडर हे पारितोषिक सौ. जागृती दीपक सोनवणे यांनी, तर तृतीय क्रमांकाचे कुकवेअर सेट हे पारितोषिक सौ. शीतल प्रदीप तायडे यांनी जिंकले.
स्व.अजितदादांच्या आठवणींना उजाळा; नेत्यांच्या संदेशांतून शेतकऱ्यांना दिलासा :
‘संवेदना दिवाळी’ उपक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवर नेत्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या निंभोरा पंचक्रोशीतील शेतकरी व कष्टकरी बांधवांना धीर आणि दिलासा देणाऱ्या विशेष ध्वनिचित्रफिती दाखविण्यात आल्या. यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ, मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागाचे पक्षप्रभारी तथा माजी मंत्री आमदार अनिलदादा पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. निर्मला शुभम नवले आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्षा तथा सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या विश्वस्त सौ. मनीषाताई तुपे यांनी आपल्या संदेशांतून शेतकरी बांधवांना आश्वस्त करत या कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पंचक्रोशीत प्रथमच झालेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक :
रावेर तालुक्यातील सर्वांत मोठ्या गावांपैकी एक असलेल्या निंभोरा येथे पंचक्रोशीत प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि माणुसकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमामुळे आयोजक कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यांनी घेतले परिश्रम :
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप सोनवणे सर आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दस्तगीर खाटीक, मुजफ्फर पटेल, भूषण भालेराव, पूर्वेश बोरसे, हबीबखान तबीब खान, दीपक मोरे, निलेश लोखंडे, रिजवान पटेल, राहुल सोनार, संदीप कैलास मोरे, ललित पाटील, आकाश बोरसे, विलास महाले, भूषण शांताराम कोळी, रोहित महाले, पियुष चिंचोले, अब्दुल मन्यार, गौरव ठाकरे, भगतसिंग नरवाडे, गौरव रणदिवे आदी सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





