गुन्हेरावेर

रावेरमध्ये विजेच्या तारा चोरणारे दोघे अटकेत; २६ किलो तार जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतशिवारातील विजेच्या तारा चोरी करणाऱ्या संशयितांविरोधात रावेर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघे रा. विवरे, ता. रावेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीच्या प्रकरणातील २६ किलो विजेच्या तारांचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.

रावेर पोलीस ठाण्यात ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोर शिवारातील गट क्रमांक ८६१ मधून भोर ते अजंदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावरील सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या विजेच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद अग्रवाल पावर प्रा. लि.चे साइट सुपरवायझर राजेंद्र रामदास ठाकूर यांनी दिली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले; मात्र घटना शेतशिवारात घडल्याने तपासासाठी उपयुक्त माहिती मिळत नव्हती.

दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतशिवारातील मोटारपंप आणि विजेच्या तारा चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेत रावेर शहरातील भंगार दुकाने, सराईत चोर आणि हिस्ट्रीशीटर यांची तपासणी करण्यात आली.

१४ ऑक्टोबर रोजी रात्री गस्तीवर असताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना रावेर-अजंदा रस्त्यावर काही संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठविण्यात आले. तेथे जुबेर तडवी आणि शरीफ तडवी हे दोघे आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तार कापण्यासाठी वापरले जाणारे कटर आणि पक्कड मिळून आली.

दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी विजेच्या तारा चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात आल्याचे सांगितले. तसेच दोन ते तीन महिन्यांपूर्वी भोर ते अजंदा रस्त्यावरील विजेच्या तारा चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले.

भंगार दुकानातून चोरीचा मुद्देमाल जप्त

आरोपी जुबेर तडवी याचे विवरे गावात भंगार दुकान असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने संबंधित गुन्ह्यातील चोरीच्या मालापैकी २६ किलो विजेच्या तारांचे तुकडे काढून दिले. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन आमोदकर, विजय चौधरी तसेच गुन्हे शोध पथकातील समाधान ठाकूर, विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील आणि रुबाब तडवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button