
जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील रमजीपूर परिसरात शेतातून पाण्याची मोटार चोरी करणाऱ्या टोळीचा रावेर पोलिसांनी छडा लावला आहे. चोरीच्या विद्युत मोटारीची विक्री करण्यासाठी संशयित आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत चौघांना ताब्यात घेतले.
नेमकी घटना काय?
फिर्यादी मोहन लालचंद कावडकर (रा. रमजीपूर) यांच्या शेतामधील खोलीतून ३ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री अज्ञात चोरांनी ५ एच.पी. समूराई कंपनीची पाण्याची मोटार चोरून नेली होती. या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
मागील काही दिवसांपासून शेतातून होणाऱ्या मोटार व कॉपर वायर चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक व बिट अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते.
तपास सुरू असताना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला आणि बिट अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम चोरीची मोटर विक्रीसाठी रमजीपूर गावात आणत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राजेंद्र सुधाकर महाजन (वय ३०), उमेश प्रकाश धनगर (वय २३), रितेश जगन्नाथ कावडकर (वय २३) आणि आनंदा गोपाळ धनगर (वय २८), सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर, यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता चौघांनी संबंधित चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरीची विद्युत मोटार हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या आणखी चोऱ्या केल्या आहेत का, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि चोरीचा माल अन्य कोणाला विकला आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. चौघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास बिट अंमलदार सिकंदर तडवी करीत आहेत.





