रावेरराजकारण

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेरचा आखाडा तापला! तीन दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुका सोसायटी मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघातून बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख योगिराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे रावेरमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागली असून, विशेषतः महायुतीकडून अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रावेर तालुका सोसायटी मतदारसंघातून मंदार पाटील यांनी माजी आमदार अरुणदादा पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. मंदार पाटील यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.

दुसरीकडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख योगिराज पाटील यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

योगिराज पाटील यांच्या उमेदवारीमुळे रावेर सोसायटी मतदारसंघातील राजकीय समीकरणांबाबत चर्चेला आणखी उधाण आले आहे. महायुतीतील इच्छुकांची संख्या आणि महाविकास आघाडीकडून पुढे आलेली दावेदारी यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

अंतिम मुदतीपूर्वी हालचालींना वेग

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या अंतिम मुदत असल्याने इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून शेवटच्या टप्प्यात हालचाली वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणे या स्वतंत्र प्रक्रिया असल्याने सध्याच्या अर्जांवरून अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सहकार क्षेत्रातील राजकीय प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे रावेर तालुका सोसायटी मतदारसंघात कोणाला अधिकृत उमेदवारी मिळते आणि अंतिम निवडणूक रिंगणात कोण टिकून राहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button