गुन्हेरावेर

ग्राइंडरच्या कटरने गळा चिरून तरुणाचा निर्घृण खून ; केऱ्हाळ्यात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून २३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील इंदिरा नगर परिसरात घडली. राजू रवींद्र कापडे (वय २३, रा. इंदिरा नगर, केऱ्हाळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून मिस्त्री कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडर मशीनच्या कटरने तरुणाच्या गळ्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला.

या घटनेने केऱ्हाळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामसिंग चिंधू भिल (वय ६२, रा. इंदिरा नगर, केऱ्हाळे) याच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामसिंग भिल हा मिस्त्री काम करतो आणि केऱ्हाळे येथे एकटाच राहतो. राजू कापडे हा त्याला दररोज जेवणाचा डबा आणून देत असल्याने दोघांची चांगली ओळख होती. मंगळवारी दुपारी राजू हा रामसिंगच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

घरात असताना कोणत्यातरी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. वाद वाढल्यानंतर संतापलेल्या रामसिंगने घरातील मिस्त्री कामाचे ग्राइंडर मशीन उचलले. त्याच्या कटरने राजूच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजू गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी रामसिंग भिल याला ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेवेळी झालेल्या झटापटीत आरोपीला देखील दुखापत झाल्याचे समोर आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी रावेर पोलीस पुढील तपास करीत आहेत. क्षुल्लक वादातून एका उमद्या तरुणाचा जीव गेल्याने केऱ्हाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button