
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील जळके शिवारात शेतात काम करताना झालेल्या किरकोळ वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरख विठ्ठल ठाकूरअसे मृत व्यक्तीचे नाव असून ते पुणे येथील रहिवासी होते. दिवाळीनिमित्त ते आपल्या नातेवाईकांकडे आले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे जळके परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोरख ठाकूर हे जळके शिवारातील शेतात काम करत असताना त्यांचा मुकुंद परलाद पाटील यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका कठीण वस्तूने ठाकूर यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोरख ठाकूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनीही जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. यावेळी आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली.
दरम्यान, घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.





