गुन्हेरावेर

अपघात झाला अन् गुटख्याचं गुपित उघडलं! कारसह ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात निंभोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अपघाताच्या निमित्ताने उघडकीस आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी एका चारचाकी वाहनासह सुमारे ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, छत्रपती संभाजीनगरमधील दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अशी उघडकीस आली तस्करी

दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळीच्या सुमारास निंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव फाट्या (ता. रावेर) येथे एका चारचाकी वाहनाने (सिल्वर-गोल्ड रंगाची हुंडाई आय-१० कार, क्र. MH-२६-V-४४२३) सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

वाहनाची प्राथमिक पाहणी करताना त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळून आले. या प्रकरणी अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुद्दस्सिर कासिम (वय २३, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशीदजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत ५ लाख ९० हजार ४४० रुपयांचा गुटखा-पानमसाला आणि १ लाख ८० हजार रुपयांची ह्युंदाई आय-१० कार, असा एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुटखा कुठून आला? मुख्य सूत्रधार कोण?

जप्त करण्यात आलेला गुटखा आणि पानमसाला नेमका कुठून आणण्यात आला होता, त्याचा पुरवठा कोण करत होते आणि या अवैध तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक जळगावचे संदीप गावीत आणि फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोउपनि अभय ढाकणे, तसेच पोलीस कर्मचारी सतीश सानप, किरण जाधव, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, प्रशांत चौधरी, अमोल वाघ आणि सफराज तडवी यांच्या पथकाने पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button