
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने शहरातील प्रसिद्ध कालिका माता मंदिरात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी (९ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या या दीपोत्सवात तब्बल २ हजार १ दिवे प्रज्वलित करण्यात आले. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झाले होते.
दिवाळीच्या उत्साहात आयोजित या विशेष उपक्रमात बँकेचे अध्यक्ष सतीश भाऊ मदाने, संचालक हिरालाल सोनवणे, मधुकर पाटील आणि ललित भैय्या चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कालिका माता मंदिर परिसरात एकाच वेळी २,००१ दिवे प्रज्वलित झाल्याने आकर्षक आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले. दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला. या दीपोत्सवामुळे दिवाळीच्या आनंदात आणखी भर पडली.
सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासोबतच धार्मिक उत्सवांमध्ये सामूहिक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम घडविणारा हा दीपोत्सव उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.





