जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । ‘मिठ आणि साखरेबाबत संशोधनातून धक्कादायक गोष्ट समोर आलीय. भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व प्रकारच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत.’टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेनं याबाबत रिसर्च केला होता.
याबाबतचा अहवाल प्रसिद् झाला. ‘मिठ आणि साखरेतील मायक्रोप्लास्टिक्स’ या नावाने ‘टॉक्सिक्स लिंक’ने रिसर्च केला. त्यासाठी त्यांनी टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्चे मीठ यासह 10 प्रकारच्या मीठावर रिसर्च केला. तसेच ऑनलाइन आणि स्थानिक बाजारातून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेचीही तपासणी केली.
‘टॉक्सिक्स लिंक’ या संस्थेला संशोधनात सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक असल्याचं निदर्शनास आले. या मायक्रोप्लास्टिकचा आकार 0.1 मिलीमीटर (मिमी) ते 5 मिमी पर्यंत असल्याचे निदर्शनास आले. जे फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह विविध स्वरूपात उपस्थित होते. रिसर्चमध्ये बहुरंगी पातळ तंतू आणि फिल्म्सच्या स्वरूपात मायक्रोप्लास्टिक्सचे सर्वाधिक प्रमाण आयोडीनयुक्त मीठामध्ये असल्याचे आढळून आले आहे.
हा रिसर्च का करण्यात आला ?
साखर आणि मीठ यामधील मायक्रोप्लास्टिक असल्याचा अहवाल आज ‘टॉक्सिक्स लिंक’ने प्रसिद्ध केला. ‘टॉक्सिक्स लिंक’चे संस्थापक रवी अग्रवाल म्हणाले की, ‘आमच्या अभ्यासाचे उद्दिष्ट मायक्रोप्लास्टिक्सवरील विद्यमान वैज्ञानिक डेटाबेसमध्ये योगदान देणे हा होता. जेणेकरुन जागतिक प्लॉस्टिक करार या समस्येचे ठोस निराकरण करू शकेल.’
रिसर्चनुसार, साखरेत मायक्रोप्लास्टिकची कॉन्सेंट्रेशन 11.85 ते 68.25 तुकडे प्रति किलोग्रॅम असल्याचे दिसून आले आहे. मायक्रोप्लास्टिक ही वाढती जागतिक चिंता आहे, कारण ते आरोग्य आणि पर्यावरण या दोघांनाही हानी पोहोचवू शकतात. हे छोटे प्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे आजारपणात वाढ होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
तर कोरड्या मिठामध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण 6.71 ते 89.15 तुकडे प्रति किलोग्रॅम असल्याचे आढळून आले. सर्वात जास्त प्रमाण आयोडीन असलेल्या मीठात आणि सर्वात कमी रॉक सॉल्टमध्ये प्लॉस्टिक आढळले. आयोडीनयुक्त मीठामध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण सर्वाधिक 89.15 तुकडे प्रति किलोग्रॅम इतके आढळले. तर सेंद्रिय रॉक मिठाचे प्रमाण सर्वात कमी 6.70 तुकडे प्रति किलोग्रॅम होते.