जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२६ । गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘काहीही झाले तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,’ अशी अत्यंत आक्रमक भूमिका सीजेपीने घेतली होती.

त्यांच्या या जिद्दीचा आणि आंदोलनाच्या तीव्रतेचाच परिणाम म्हणून अखेर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले असून, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.












