जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२६ । ऑरेंज अलर्ट जारी असतानाही बुधवारी जळगाव शहरात अपेक्षेपेक्षा कमी, अवघ्या १० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी दिवसभर उकाडा आणि ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहिल्याने नागरिक हैराण झाले. मात्र, रात्री सुमारे सातनंतर अचानक हवामानात बदल झाला आणि अवघ्या तासाभरात ८ मिमी मुसळधार पाऊस कोसळल्याने उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर जवळपास दोन आठवडे पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. मात्र, २० जुलैपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. हवामान विभागाने बुधवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, दिवसभरात केवळ १० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर गुरुवारी दिवसभर उकाडा कायम राहिला. सायंकाळनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि रात्री ७ नंतर शहरासह परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

मुसळधार सरींमुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. संध्याकाळी काम आटोपून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले. आकाशवाणी चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, आज (शुक्रवारी) जळगाव जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच सखल भाग आणि पाणी साचणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांतही जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पावसाची शक्यता आहे.








