जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । गेल्या काही दिवसापूर्वीच मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या एका फौजदाराला निलंबित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. आता अशातच तमाशात नाचणे पोलिसाच्या अंगाशी आले असून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एका सहायक फौजदाराला निलंबित केले आहे.

भटू वीरभान नेरकर असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याचा आणखी एक कर्मचाऱ्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. दरम्यान, या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याने गावात तमाशाचे आयोजन केले होते. तेथे भटू नेरकरसह एका अन्य कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे नेरकरला निलंबित करण्यात आले तर दुसऱ्याचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे?, त्याची चौकशी सुरु असून तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.












