जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । वरील बातमीचे शीर्षक वाचून तुम्हाला सुखद धक्का लागला असेल यात शंका नाही. मात्र हे काही आपल्या भारतात घडलेले नाहीये. तर हे आपले शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेत घडले आहे. श्रीलंकेत पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेतल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महागाईने त्रस्त सामना करणाऱ्या श्रीलंकेत पेट्रोल तब्बल 40 रुपयांनी घसरले आहे. डिझेलचे दर मात्र जैसे थेच आहेत. डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. श्रीलंकेच्या सरकारने शनिवारी पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 40 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच डिझेलचे दर पेट्रोलच्या किमतीत अधिक असल्याचे दिसून येत आहे. श्रीलंकेत आता पेट्रोलपेक्षा डिझेल महागले आहे.

श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर यांनी शनिवारी, 01 ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेतला. पुढे त्यांनी सांगितलं की, पेट्रोलचे नवे दर आता 410 श्रीलंकन रुपये प्रति लिटर असतील. पेट्रोलच्या किमतीत कपात करण्यापूर्वी पेट्रोल 450 रुपये प्रति लिटरने विकले जात होते. सरकारच्या या निर्णयानंतर श्रीलंका इंडियन ऑईल कॉर्पोरेशननंही सरकारी किंमतीच्या पातळीनुसार, पेट्रोलच्या दरांत कपात करणार असल्याचचेही सांगितलं आहे. श्रीलंकेत डिझेलची किंमत अजूनही 430 श्रीलंकन रुपये प्रति लिटरवरतीच कायम आहे.













