जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबई येथे गणपती दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या एका २५ वर्षीय अभियंता तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मुंबईत ‘लालबागच्या राजाच्या’ मंदिर परिसरात घडली. जयदीप मेघराज नेमाडे (२५, रा. जीवनमोती सोसायटी, शिरसोली रोड, जळगाव) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेने जळगावसह त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

जळगावातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मेघराज सुभाष नेमाडे यांचा मुलगा जयदीप हा अभियंता म्हणून पुणे येथील कंपनीत नोकरीला होता. यंदाही तो गणेशोत्सवात मुंबई येथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता.

गुरुवारी रात्री तो दर्शनरांगेत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याने अन्य मित्राला दर्शनासाठी पाठवून तो बाहेर थांबला. अधिकच त्रास होऊ लागल्याने मंदिरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जयदीपला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मयताच्या पश्चात वडील, काका, चुलत भाऊ, आजी असा परिवार आहे.






