जळगाव लाईव्ह न्यूज । मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला एमडी निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईचे धागेदोरे जळगाव, मुंबई, ठाणे, रायगड, गुजरातमार्गे थेट उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत.

या कारवाईत जळगावमधील मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरातील दोन वितरकांसह तब्बल २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी, १८ लाख ७० हजारांची रोकड, २६० लिटर घातक रसायने आणि मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळेतील साहित्य असा सुमारे १३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता तपासातून पुढे आली आहे.

नालासोपाऱ्यातील कारवाईने उलगडले रॅकेट
२४ जून २०२६ रोजी रात्री गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर ते मनवेल पाडा रोड परिसरात सापळा रचण्यात आला. बाबा पार्किंग परिसरातून अविनाश ऊर्फ सोनू लोकनाथ अय्यर (२२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (२३) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत ११२ ग्रॅम एमडी, किंमत सुमारे ३ लाख ३६ हजार रुपये, आढळून आले. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान आरोपींच्या चौकशीतून या मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटची माहिती समोर आली.
गुजरातमध्ये शेतजमिनीत उभारली एमडी फॅक्टरी
तांत्रिक तपास आणि आरोपींच्या चौकशीत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात एमडी तयार करण्याची अवैध फॅक्टरी सुरू असल्याचे समोर आले. अबडासा तालुक्यातील सांधाण गावातील शेतजमिनीत आरोपी जुम्मा तालाब ठाकरा याच्या मालकीच्या जागेवर ही फॅक्टरी उभारण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत फॅक्टरीचा शोध घेतला आणि जुम्मा ठाकरा याला अटक केली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही फसला
तपासादरम्यान ‘जालिम गँग’शी संबंधित आरोपी आर्यन हरुण सय्यद ऊर्फ जालिम याने एमडी तयार करण्यासाठी लागणारे लॅब साहित्य आणि रसायने रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच आरोपी जाहीद शेख ऊर्फ जावेद भाई याने हा मुद्देमाल विरार-जेएनपीटी महामार्गावरील रायते, कल्याण परिसरात फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावत सर्व मुद्देमाल जप्त केला.
जळगावमध्ये ४ किलो ९११ ग्रॅम एमडी जप्त
मुंबईतील कापडिया नगर, कुर्ला परिसरातून मोहमद हसीब सिध्दीकी ऊर्फ इजाज मर्चेंट याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ११ किलो ८०४ ग्रॅम एमडी आणि १८ लाख ७० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. हसीब सिध्दीकीच्या चौकशीतून एमडीचा मोठा साठा जळगावला पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात कारवाई करत मेहरुण येथील रहिम ताहेर पिंजारी (२८) आणि उस्मानिया पार्क येथील सय्यद मुशाइद अली मुमताज अली (३९) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ९११ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे नेटवर्क समोर आले आहे.
प्रयागराजमध्ये सापडला मुख्य कारखाना
जळगाव आणि मुंबईतील आरोपींच्या चौकशीतून एमडीचा पुरवठा उत्तर प्रदेशातील रजनिश रामचंद्र मिश्रा आणि शिवधन शंभुनाथ मिश्रा यांच्याकडून होत असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील भदोई येथे कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी प्रयागराज जिल्ह्यातील कोसाडा काला, मांडा परिसरातील शेतजमीन भाड्याने घेतल्याचे उघड झाले. याच ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून एमडी निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आला होता. पोलिसांनी या कारख्यावर छापा टाकत ५२ किलो ९३२ ग्रॅम तयार एमडी जप्त केला. तसेच एमडी निर्मितीसाठी वापरले जाणारे २६० लिटर घातक रसायने आणि मोठ्या प्रमाणावर लॅब साहित्य जप्त करून कारखाना सील केला.
२१ आरोपी जेरबंद
या प्रकरणात नालासोपारा, मुंबई, ठाणे, रायगड, गुजरात, जळगाव आणि उत्तर प्रदेशातील मिळून एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये जळगावातील रहिम ताहेर पिंजारी आणि सय्यद मुशाइद अली यांचाही समावेश आहे.
पोलिसांची मोठी कामगिरी
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त गोंडुराम बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले, प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्यासह पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. सायबर सेलच्या पथकानेही तपासात महत्त्वाची मदत केली.
नालासोपाऱ्यातील अवघ्या ११२ ग्रॅम एमडीच्या कारवाईपासून सुरू झालेला तपास थेट प्रयागराजमधील एमडी निर्मितीच्या कारखान्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे ही कारवाई अंमली पदार्थ तस्करीविरोधातील मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.






