जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरालगत गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून नदीपात्रात उडी घेतलेल्या विवाहितेचा सुमारे १५ तासांनंतरही शोध लागलेला नाही. जयश्री चौधरी असे या महिलेचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली होती. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. आज शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी पुलावरून एका महिलेने गिरणा नदीच्या पात्रात उडी घेतल्याची घटना समोर आली. हा पूल नदीपात्रापासून अंदाजे ७० ते ८० फूट उंच असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत महिलेचा शोध घेण्यात आला. मात्र, अंधार आणि नदीपात्रातील परिस्थितीमुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
सुमारे १५ तासांपासून शोधमोहीम सुरू असूनही जयश्री चौधरी यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून नदीपात्रात विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे. महिलेने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, नदीपात्रात शोधमोहीम सुरू असून महिलेचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.









