⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

लोकप्रतिनिधी, राजकारणी ठरताय कोरोनाचे सुपर स्प्रेडर!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील गेल्या आठवडाभरातील कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता रुग्णसंख्या ५०० च्या आतच आहे. दररोज येणारा आकडा ३०० ते ५०० च्या मध्येच असल्याने जिल्हावासियांना काहीसा दिलासा आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन संपत असताना एक-एक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले. सुदैवाने जळगावातील एकही नेता त्यात नव्हता परंतु अधिवेशन संपताच जिल्ह्यात देखील नंबर लागू लागले. आपल्या सोबतच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येत असला तरी लोकप्रतिनिधी, राजकारणी आपले दौरे, कार्यक्रम आटोपते घेत नाही. जळगावात एक मंत्री, चार आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले असून इतर आजी-माजी लोकप्रतिनिधी, राजकारण्यांची संख्या वेगळीच आहे. आपल्या संपर्कातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर लोक चाचणी करून न घेता बिनधास्त फिरत असल्याने धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका टळल्यानंतर गत दोन महिन्यांपासून देशाची खर्‍या अर्थाने कोरोनापूर्व काळाकडे वाटचाल सुरु झाली असतांना ओमायक्रॉनची एन्ट्री झाली. कोरोनाच्या या विषाणूचा डेल्टापेक्षा कितीतरी अधिक पटीने फैलाव होत असल्याने अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये दैनंदिन लाखो रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी तेथील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा कमालीचा ताण आला आहे. भारतामध्येही ओमायक्रॉनने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचे गत पाच दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात घातलेल्या थैमानाच्या कटू आठवणी अजूनही अनेकांच्या स्मृतीतून गेल्या नसतांना आता ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणे अटळ मानले जात आहे. कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. अशात राज्यात राजकीय कार्यक्रम आणि बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे. आता या नेतेमंडळींना कोरोना झाल्यामुळे त्यांना भेटलेले दुसरे नेत्यांची चिंता वाढली आहे. बहुतांश वेळा राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. अहमदनगरमध्ये भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या लग्नात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. सर्वात गंभीर बाब म्हणजे, राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोना बाधित झाले आहेत. यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के.सी.पाडवी, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सागर मेघे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिपक सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम चोपड्याच्या आमदार लता सोनवणे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांच्या संपर्कातील काही व्यक्ती देखील पॉझिटिव्ह आढळून आले. हिवाळी अधिवेशन आटोपून घरी पोहचलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील, जामनेरचे आ.गिरीश महाजन हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. जिल्ह्यातील विविध महत्वाच्या बैठका, कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर दोनच दिवसांनी जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर आणि त्यानंतर जळगावचे आ.सुरेश भोळे यांचा अहवाल देखील सकारात्मक आला. गेल्या पंधरवड्यात समोर आलेल्या या लोकप्रतिनिधींचा जनसंपर्क दांडगा असून त्यांच्या संपर्कात हजारो नागरिक आले आहेत. लोकप्रतिनिधींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले असले तरी त्याला दाद देणारे फार कमी आहेत.

सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिकच काय तर सोबत असलेले इतर राजकारणी, नगरसेवक, पुढारी देखील स्वतःहून कोरोना चाचणी करून घेत नाही. कोरोनाचे सध्या आढळून येत असलेल्या रुग्णांना लक्षणे नसली तरी संसर्ग अधिक आहे. त्यातच बदलते वातावरण, पाऊस, थंडी यामुळे सर्दी, पडसे, खोकल्याचे रुग्ण देखील वाढत आहे. लोकप्रतिनिधींना गांभीर्य नसले तरी गेल्या महिनाभरात तिघांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे हि बाब गंभीर आहे. आपले लोकप्रतिनिधी आणि राजकारणीच जिल्ह्यातील कोरोनाचे सुपर स्प्रेडर असून पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांनी आतापासून पाऊले उचलणे आवश्यक आहे. सुदैवाने ओमायक्रोनचा एकही रुग्ण अद्याप जिल्ह्यात आढळून आला नसला तरी खान्देशात मात्र येऊन ठेपला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकारणी, पुढारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी बाळगल्यास लॉकडाऊनचा धोका नक्कीच टळेल हे मात्र निश्चित आहे. एकंदरीत आपल्या सेवेसाठी तत्पर असलेले राजकारणी आपल्याला कोरोनाचा प्रसाद देण्यात तत्पर असल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा :