जळगाव लाईव्ह न्यूज । आखाती देशातील संघर्षाची झळ भारतासह जगभरात बसत आहे. एकीकडे अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे इंधनपुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली असून काही शहरांमध्ये हॉटेल आणि खाद्य व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. गॅस सिलिंडरच्या मर्यादित उपलब्धतेमुळे सरकारने व्यावसायिक वापरासाठी नवीन नियम लागू केले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली असून खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

अमेरिका-इराण युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या संघर्षाचा परिणाम केवळ इंधनापुरता मर्यादित न राहता औषधे, खत आणि अन्नधान्य क्षेत्रावरही दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे दर 113 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने आयात खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. काही औषध बाजारातही दरवाढ जाणवत असून कच्चा माल, पॅकेजिंग खर्च आणि आयात खर्च वाढल्याने औषधांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या साठा उपलब्ध असला तरी भविष्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय खत उत्पादनावरही मोठा परिणाम होत असून नैसर्गिक वायूच्या तुटवड्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे खाडीतील काही खत कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, ज्याचा शेतीवर परिणाम होऊ शकतो.एकूणच, या युद्धामुळे इंधन, अन्न आणि औषधांच्या किमती वाढून सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ होत आहे. युद्ध लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.











