सणासुदीपूर्वीच फोडणी महागली! जळगावात खाद्यतेलाचे दर भडकले; पाहा सध्याचे ताजे भाव

जुलै 16, 2026 12:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि देशातील मान्सूनच्या लहरीपणाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. काही महिन्यांपूर्वी ग्राहकांना दिलासा देणारे खाद्यतेलाचे दर आता पुन्हा भडकले असून, १५ किलोच्या खाद्यतेलाच्या डब्यामागे सुमारे १०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे विविध खाद्यतेलांच्या किरकोळ बाजारातील किमती प्रति लिटर १० ते १२ रुपयांनी महागल्या असून, गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे.

oiltoday

दरवाढीची मुख्य कारण?

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य-पूर्वेतील वाढता तणाव, जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि देशात उशिरा दाखल झालेल्या मान्सूनमुळे तेलबिया पिकांच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी खाद्यतेलाच्या दरात पुन्हा तेजी आली आहे.

यंदा केवळ आंतरराष्ट्रीय घडामोडीच नव्हे, तर राज्यात पावसाअभावी पेरण्या लांबल्या असून अनेक भागांत दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याचा परिणाम बाजारावरही होत असून खाद्यतेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत.

दरम्यान, सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच खाद्यतेलाच्या दरात अचानक झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने महिन्याचा घरगुती खर्च वाढणार असून, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना याचा मोठा फटका बसत आहे.

खाद्यतेलाचे सध्याचे किरकोळ दर (प्रति लिटर)

शेंगदाणा तेल : जून ₹२७० → जुलै ₹२१५ (बदल नाही)
सूर्यफूल तेल : जून ₹१७० → जुलै ₹१८०
राईस ब्रॅन तेल : जून ₹१६० → जुलै ₹१६५
पाम तेल : जून ₹१७० → जुलै ₹१७०
सोयाबीन तेल : जून ₹१५० → जुलै ₹१६५

तेलाचे १५ किलो डब्याचे दर

शेंगदाणा : २८०० ते ३३५० रु.
सूर्यफूल : २८०० ते २८५० रु.
पाम तेल : २५५० ते २६५० रु.
तिळीचे तेल : ३२०० ते ३२५० रु.
सोयाबीन : २५८० ते २६५० रु.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now