कौटूंबिक वादातून हत्येचा संशय : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : एकाच दिवशी तिहेरी खुनाने जिल्ह्यात भुसावळ पुन्हा चर्चेत
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची हत्येची घटना ताजी असताना भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने भुसावळसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 24 तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तर श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर काही संशयितांमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा वापर होवून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करण्यात आल्याने त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या भावंडांची तलवारीसह चाकूने वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती तर या हल्ल्यात इंगळे व साळुंखे नामक तरुणदेखील जखमी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या हत्याकांडाच्या अवघ्या चार तासानंतर श्रीराम नगरात हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
कुविख्यात गुन्हेगार निखीलची चाकू मारून हत्या
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधिकार्यांची धाव
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला असून तो शवविच्छेदनासाठी हलवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.