⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । देशभरात महिला व बालविकास मंत्रालयाच्या् वतीने सप्टेंबर महिन्यात ‘राष्ट्रीय पोषण अभियान’ राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने सावखेडा येथील जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये दि. ७ ते १३ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आहारतज्ञ, पोषणतज्ञ व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आहाराचे महत्त्व कळावे म्हणून आरोग्यदायी संतुलित आहाराचे महत्त्व, त्याचबरोबर कुपोषण व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावर डॉ. जहागीरदार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विध्यार्थ्यांना केले. या सप्ताहात डॉ. प्रिया पटनी व इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव शाखेच्या सहकार्याने विध्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर देखील घेण्यात आले.

या शिबीराला विद्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी इंडियन डेंटल असोसिएशन पथकातील डॉक्टरांच्या टीमने शिबीरात पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांना टूथपेस्ट आणि टुथब्रशने दातांची निगा कशी राखावी याबद्दल माहिती देवून या पथकाने प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. काही विद्यार्थ्यांना दातांची समस्या होती त्यांना पुढील उपचाराकारिता इंडियन डेंटल असोसिएशनमधील डॉक्टरांच्या रूग्णालयात पालकांना सोबत घेऊन येण्यास डॉक्टरांनी सांगितले.

या उपक्रमासाठी उपस्थित आरती पाटील, प्रशांत महाशब्दे, सविता तायडे यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.